Pune Crime News | कासुर्डीत बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; वैद्यकीय पदवी नसतानाही वर्षानुवर्षे उपचार, यवत पोलिसांची कारवाई

पुणे : Pune Crime News | दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील आखाडे वस्तीवर वैद्यकीय पदवी व आवश्यक परवाने नसतानाही स्वतःला डॉक्टर म्हणून भासवत नागरिकांवर उपचार करणाऱ्या एका बोगस डॉक्टरचा यवत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ओमप्रकाश बन्सीलाल स्वर्णकर OmPrakash Bansilal Swarnakar (रा. सदर बाजार, भिलवाडा, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.

खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष शंकर शिरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस तपासात आरोपीकडे कोणतीही मान्यताप्राप्त वैद्यकीय पदवी किंवा वैध प्रमाणपत्र नसल्याचे समोर आले. तरीही तो अनेक वर्षांपासून डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करत होता.

तसेच, औषध विक्रीचा परवाना नसतानाही विविध प्रकारची औषधे साठवून त्यांचा वापर करण्यात येत असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर स्वरूपाचा खेळ सुरू असल्याचे तपासातून स्पष्ट झाले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून नामांकित कंपन्यांची औषधे, गोळ्या, एक होंडा सिटी चारचाकी वाहन आणि रोख रक्कम असा सुमारे ६ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बोगस वैद्यकीय व्यवसायाविरोधात प्रशासनाने आणखी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top